गेट उघडण्यास उशीर झाल्याने सुरक्षा रक्षकाला ठार मारण्याचा प्रयत्न

0
382

खराबवाडी, दि. ०४ (पीसीबी) – जेवण करत असल्यामुळे गेट उघडण्यास उशीर झाल्याने दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. लाकडी दांडक्याने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री साडेनऊ वाजता खराबवाडी येथील बंद पडलेल्या फोर्जीक कंपनीच्या गेटवर घडली.

ओमकार जयराम शिंदे (वय 23, रा. चाकण), आर्यन दशरथ चव्हाण (वय 19, रा. चाकण) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी हनुमंत रंगनाथ आबुज (वय 55, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल पानझाडे (वय 35) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथे बंद पडलेल्या फोर्जीक कंपनीच्या गेटवर अमोल हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी गेटवर आले. त्यांनी गेट उघडण्यास सांगितले. मात्र अमोल हे जेवण करत असल्यामुळे त्यांना गेट उघडण्यास उशीर लागला. त्यावरून आरोपींनी अमोल यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांडक्याने मारून अमोल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.