दि.१६(पीसीबी)-जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाचा परिणाम आता भारतातील इंधन व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. विशेषतः इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती आणि पुरवठ्यावर होत असल्याचे चित्र समोर आले आहे.काही ठिकाणी गॅस मिळण्यात उशीर होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गॅस बुकिंग आणि वितरणासंदर्भात काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत.
केंद्र सरकारने ७ मार्चपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे ७ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे १४.२ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर आता सुमारे ९६५ रुपयांना मिळत आहे. दरवाढीबरोबरच गॅस बुकिंग आणि वितरणाच्या नियमांमध्येही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
नवीन नियमानुसार, एकदा गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर लगेच दुसरा सिलिंडर बुक करता येणार नाही. पुढील बुकिंगसाठी किमान २५ दिवसांचा कालावधी आवश्यक असेल. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी अधिक ठेवण्यात आला असून तेथे सुमारे ४५ दिवसांनंतरच दुसरा सिलिंडर बुक करता येणार आहे.
सरकारने गॅस वितरण अधिक पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी बुकिंगनंतर २ ते २.५ दिवसांच्या आत सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा नियम लागू केला आहे. तसेच एका ग्राहकाला वर्षभरात जास्तीत जास्त १५ सिलिंडर बुक करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) सुविधा असलेल्या घरांबाबतही नवा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या घरांमध्ये आधीपासून पीएनजी कनेक्शन आहे, त्या घरांना एलपीजी सिलिंडरचा पुरवठा दिला जाणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे.या सर्व उपाययोजनांचा मुख्य उद्देश म्हणजे गॅसचा पुरवठा सर्व ग्राहकांना समान पद्धतीने मिळावा, तसेच सिलिंडरचा काळाबाजार रोखता यावा. त्यामुळे नागरिकांनी नव्या नियमांची माहिती घेऊन गॅस बुकिंगचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








































