गॅस चोरी करून भरलेल्या सिलेंडरची चढ्या दराने विक्री

0
122

दि 29 मे (पीसीबी ) – मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये धोकादायकपणे तसेच विनापरवाना चोरून गॅस काढत त्या सिलेंडरची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 28) दुपारी संस्कार गॅस एजन्सी, निघोजे गाव येथे करण्यात आली.

आकाश विजय गोसावी (वय 19, रा. चाकण. मूळ रा. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गुट्टे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोसावी याने बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये चोरून गॅस काढला. हा गॅस काढत असताना त्याने कोणतीही सुरक्षेची काळजी तसेच परवानगी घेतली नाही. चोरून भरलेल्या सिलेंडरची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत आकाश गोसावी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 36 हजार 800 रुपये किमतीचा गॅस साठा आणि साहित्य जप्त करण्यात आले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.