गॅस कनेक्शन कापण्याच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक

0
12

अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून ८८ हजाराला गंडा; कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


दि . १४ ( पीसीबी ) – गॅस कनेक्शन कापण्याच्या बहाण्याने मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करण्यास सांगून ८८ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपककुमार गोविंदलाल दुगट (वय ३४, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिलला अज्ञाताने फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर खोटा मेसेज पाठविला. या मेसेजच्या माध्यामातून फिर्यादी यांचे एमएनजीएल गॅस कनेक्शन रात्री साडेनऊ वाजता कापले जाणार असल्याचे कळविण्यात आले होते. तसेच मागील महिन्याचे गॅस बिल अपडेट झाले नसल्याचे कारण यावेळी फिर्यादी यांना सांगण्यात आले. तसेच याबाबत गॅस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आरोपीने सुचविले.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीला एका खाजगी बँकेचे मोबाईल अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून परस्पर ८८ हजार ९८० रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेऊन आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.