पिंपरी दि. २४ (पीसीबी) -बेकायदेशीरपणे सुरक्षेची कुठलीही साधने न वापरता घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या भरलेल्या सिलेंडर मधून गॅस चोरी करणा-या हिंजवडी आणि वाकड मधील दोन ठिकाणी गुन्हे शाखा युनिट चारने छापे मारले. यात दोघांना अटक करून 81 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
पहिली कारवाई मारुंजी रोड हिंजवडी येथील शेषनाथ गॅस सर्व्हिस या दुकानात शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. श्रीकांत विठ्ठलराव माने (वय 26, रा. मारुंजी, ता मुळशी), रवी जांभुळकर यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घरगुती वापराचे, व्यावसायिक सिलेंडर मधून रिफील पाईप मशीनच्या साहाय्याने गॅस चोरी केला. यासाठी आरोपींनी कुठलीही सुरक्षा बाळगली नाही. या कारवाईत पोलिसांनी 41 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीकांत माने याला अटक केली आहे.
दुसरी कारवाई शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी साडेसहा वाजता काळा खडक वाकड येथील लक्ष्मी गॅस एजन्सी येथे करण्यात आली. मारुती बाबुराव लंगोटे (वय 23, रा. भगवान नगर, वाकड) याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानेही घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर मधून गॅस अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता काढून चोरी केली. त्याच्या ताब्यातून 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.