गृहनिर्माण सोसायट्यांना सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी भाजप कटिबद्ध

0
191

पिंपरी, दि. 22 ,(पीसीबी): पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. सोसायट्यांच्या प्रश्नांसंदर्भात सोसायटी फेडरेशनसोबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करू. तसेच सर्व रस्ते विकास आराखड्यानुसार करून वाहतूक व्यवस्था सुरळित करण्याचे आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वाकडमधील सोसायट्यांना दिले.

वाकड व परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये फडणवीस यांनी सोसायट्यांचे प्रतिनिधी व नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री बाळा भेगडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, वाकडमधील भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी व माजी नगरसेवक तसेच वाकडमधील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना येणाऱ्या दैनंदिन अडीअडचणी समजून घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधून प्रत्येक अडीचणी व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे गाऱ्हाणे मांडले. विकास आराखड्यानुसार रस्ते होत नसल्याने वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. बिल्डरांचाही अनेक प्रकारे त्रास सोसायट्यांतील नागरिकांना सहन करावा लागतो. मजल्यावर मजले चढतात पण पाण्याचा प्रश्न काही सुटत नसल्याकडे त्यांनी फडणवीसांचे लक्ष वेधले.

सोसायट्यांच्या प्रतिनिधींकडून सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत तोडगा काढण्यासाठी सोसायटी फेडरेशनसोबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. रस्ते, वाहतूक, पाणी, कचरा या सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील जनतेने पहिल्यांदाच भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता दिल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत विकासाला प्रचंड गती देण्यात आली आहे.

काही प्रश्न सुटलेले नसतील तर ते सुद्धा सोडवण्याची धमक फक्त भाजपमध्येच आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे आम्ही दुर्लक्ष करणार नसल्याचे वचन त्यांनी दिले. हे प्रश्न सोडवण्यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शासन आणि महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता. अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. काही राहिलेले प्रश्नही सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोत मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी गृहनिर्माण सोसोयट्यांतील नागरिकांना केले.