गृहनिर्माण संस्थांमधील ‘एसटीपी’  दिखाव्यापुरतेच,  मैलामिश्रित पाणी सोडले जातेय नदी पात्रात – श्रीरंग बारणे

0
193

खासदार बारणे यांनी अधिका-यांसह केली पवना नदीची पाहणी

थेरगाव, दि. २६ (पीसीबी) – पीएमआरडीए भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दिखाव्यापुरतेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहेत. मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. दुषित पाण्यामुळे पवना नदीची गटारगंगा झाली आहे. नदीचे प्रदुषण रोखण्याबाबत तातडीने उपाययोजना, कठोर पाऊले उचलण्याच्या सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.

पवना नदीवरील केजुदेवी बंधारा येथे मागील आठ दिवसांपूर्वी लाखो मासे मरण पावले. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. पवना नदीच्या पात्रात थेट डेनेज मिश्रीत पाणी सोडले जात असल्याने नदी पात्रालगत दुर्गंधी पसरली आहे. यापार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी आज (सोमवारी) महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह नदीपात्राची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यावेळी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, ”पवना नदी पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र 24 किलो मीटर आहे. नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नदीला गटारगंगेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) भागात मोठ-मोठ्या गृहनिर्माण संस्था उभारल्या जात आहेत. या सोसायट्यांमध्ये दिखाव्यापुरतेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहेत. हे प्रकल्प कार्यान्वीत नाहीत. परिणामी, मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही”.

”देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील घाण पाणीही नाल्याद्वारे थेट नदीत येत आहे. ताथवडे पासून एक मोठा नाला थेट नदीपात्राला जोडला आहे. महापालिकेची ड्रेनेज लाईनही नदीपात्रा लगत आहे. त्यातूनही ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात जाते. दुषित पाण्यामुळे पवना नदीची गटारगंगा झाली आहे. नदी प्रदूषित होण्याला अधिका-यांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. नदी स्वच्छ ठेवण्याकडे आत्ताच गांभीर्याणे पहावे. नदी प्रदुषणाकडे आणखी दुर्लक्ष केल्यास भविष्यात पिंपरी-चिंचवडकरांना अतिशय घाण पाणी प्यावे लागेल. नदी प्रदुषणाकडे आपण जातीने लक्ष घालावे. पवनमाई सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी तातडीने कठोर पाऊले उचलावीत”, अशा सूचना खासदार बारणे यांनी आयुक्तांना दिल्या.