गुहागर, दि. १६ (पीसीबी) – गुहागमऱमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक भिडले आहेत. भास्कर जाधवांच्या समर्थकांकडून निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उद्धव ठाकरेंची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. तसंच त्यांनी भास्कर जाधवांना आव्हान दिलं होतं. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज निलेश राणे यांची सभा आज आयोजित होती. या सभेला ते जात असतानाच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आणि एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आहे. तसंच वाहतूक विस्कळीत झाली असून तीदेखील सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.










































