गुलाबराव पाटलांना झापलं उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेंचं कौतुक

0
309

मुंबई दि. २१ (पीसीबी) – विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना झापलं ते योग्यच केलं. विधिमंडळात शिस्तीचा आग्रह प्रत्येकाने पाळायला हवा, तुम्ही तो नेहमी पाळता आणि जे पाळत नाही त्यांना योग्य शब्दात खडसावताही… सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं. नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या पुस्तक प्रकाशनाला ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, आमदार रविंद्र वायकर, नितीन बानुगडे पाटील, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत १८ तारखेला शिक्षकांच्या निधीवरुन प्रश्न विचारला. याचविषयी विधानपरिषदेत चर्चा सुरु होती. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खाली बसून गुलाबराव पाटील काहीसे कुजबुजत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गुलाबराव पाटील यांना पहिल्यांदा समजावलं. खाली बसून बोलू नका, तुमची वेळ आल्यावर तुमचं म्हणणं मांडा, असं गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर गुलाबरावांनी मला बोलायचं आहे, असं म्हणत हातवारे केले आणि बोलायला उभे राहिले. ते आवेशपूर्ण अंदाजात विधान परिषदेत भाषण करत होते.यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबरावांना सूचना केली. त्यावर उपसभापती ताई आपण मध्ये बोलू नका… असं म्हणत गुलाबरावांनी नीलम गोऱ्हे यांच्या दिशेने इशारा केला. त्यानंतर नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या. “तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता… बसा खाली… मंत्री असाल तुमच्या घरी….” अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं.

मग तो मंत्री असो वा कुणी असो.. सभागृहात आल्यावर त्याने शिस्तीत वागलं पाहिजे. हे खडसावून सांगितलं, शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल तुमचे खरं तर आभार… तो कोण होता, म्हणून तुम्ही त्याला खडसावलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देत नाही. तुम्ही ज्या पदावर बसलात त्याला न्याय देताना सभागृहाची उंची पाळून संबंधिताला योग्य शब्दात समज दिली गेलीच पाहिजे.. अगदी उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले, मग तो कोणताही मुख्यमंत्री असो, तरी तेव्हासुद्धा कान उघाडण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. सभागृहाची उंची पाळावीच लागणार, गैरवर्तनाला अजिबात थारा नाही. बाकी काही असाल, तुमच्याच शब्दाल सांगायचं झालं तर… कुणीही असाल तुमच्या घरी…”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं.