गुरुवारी यशवंत – वेणू गौरव सोहळा

0
292

पिंपरी,दि. ३ (पीसीबी) – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने गुरुवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे यशवंत – वेणू गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य आदर्श गाव संकल्प योजना कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये माजी खासदार विदुरा उर्फ नाना नवले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मला नवले या दांपत्याला यशवंत – वेणू सन्मान प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघोले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना वाघोले या दांपत्याला यशवंत – वेणू युवा – युवती सन्मान, प्रसाद कोलते यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार, सुभाष चटणे यांना सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याप्रीत्यर्थ भाऊसाहेब भोईर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. जयभवानी एंटरप्रायजेसचे संचालक प्रशांत गोडगे – पाटील सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून विनामूल्य असलेल्या या सोहळ्याला सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.