“गुन्हे दाखल पतीला भाजप – आरपीआय युतीचे तिकीट? लाडक्या बहिणीला पैसे नकोत, जीवाचं संरक्षण द्या!” – प्रज्ञा वाव्हळकर

0
4

vकुणाल व्हावळकरांच्या पत्नीचा भाजप-आरपीआयवर सणसणीत आरोप

पिंपरी, दि. २७ – भाजप सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या गप्पा मारत असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र एका महिलेवर होत असलेल्या अन्यायामुळे मोठा राजकीय आणि सामाजिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांना भाजप-आरपीआय युतीकडून महापालिका निवडणुकीचे तिकीट देण्याच्या हालचाली सुरू असताना, त्यांच्याच पत्नी प्रज्ञा कुणाल वाव्हळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, आरपीआय आणि संपूर्ण युतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

प्रज्ञा वावळकर यांनी थेट सवाल उपस्थित करत विचारले की, “भाजप नेमक्या कोणत्या आधारावर कुणाल वाव्हळकर यांना महापालिकेचे तिकीट देत आहे? ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्याविरोधात माझी स्वतःची चार्जशीट न्यायालयात दाखल आहे, अशा व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनवण्याचा भाजपचा विचार आहे का?” कुणाल वाव्हळकर हे प्रभाग क्रमांक २५ व २६ मधून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात असताना, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गंभीर प्रश्नांकडे भाजप व आरपीआय जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप प्रज्ञा वाव्हळकर यांनी केला. “एकीकडे भाजप सरकार महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणत दरमहा पंधराशे रुपये देते, पण दुसरीकडे एका विवाहित महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला वाऱ्यावर सोडले जाते. हाच महिलांसाठीचा न्याय आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.

प्रज्ञा वाव्हळकर यांनी पत्रकार परिषदेत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील वेदनादायक वास्तव मांडले. “कुणाल वाव्हळकर हे ना मला पाहतात, ना माझ्या मुलीची जबाबदारी घेतात. आजपर्यंत माझ्या मुलीच्या पालन-पोषणासाठी एक रुपयाचीही पोटगी दिलेली नाही. आमचा घटस्फोट अद्याप झालेला नाही, तरीही मला भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी सांगितले.

“जे स्वतःच्या पत्नी आणि मुलीची जबाबदारी पार पाडू शकत नाहीत, ते पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची लोप्रतिनिधी म्हणून जबाबदारी कशी पार पाडणार?” असा संतप्त सवाल करत त्यांनी भाजपच्या ‘सुशासन’ आणि ‘नैतिकते’च्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी त्यांनी सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे मांडला. “आज आमच्यावर एवढा अन्याय होत आहे. उद्या जर हेच व्यक्ती सत्तेवर आले, तर मला आणि माझ्या मुलीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मला लाडकी बहीण योजनेतून पैसे नकोत, मला संरक्षण हवं आहे,” अशी ठाम आणि भावनिक मागणी त्यांनी केली.

प्रज्ञा वाव्हळकर यांनी यावेळी मोठी राजकीय घोषणा करत पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. “कुणाल वाव्हळकर हे शहरातील कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढू देत, मी स्वतः त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रभाग क्रमांक २५ किंवा २६ असो मी त्यांच्या विरोधात ते पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही प्रभागातून निवडणूक लडूदेत मी त्यांच्या विरोधात त्यांची पत्नी म्हणून, एक अन्यायग्रस्त महिला म्हणून महापालिकेची निवडणूक लढवणार,” असे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे भाजप-आरपीआय युतीच्या उमेदवार निवडीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या आणि सन्मानाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या पक्षांची खरी भूमिका काय आहे.