सांगवी, दि. 24 (प्रतिनिधी) – तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, अशी भिती दाखवत एका महिलेची नऊ लाख 82 हजार 106 रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे 25 जुलै 2023 रोजी ऑनलाइन पद्धतीने घडली.
याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 23) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ध्रुव (संपूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) मो.नं. 9629980953, अजय कुमार बन्सल, डी.एस.स्वामी आणि आयसीआयसीआय बँकेचा खाते नं 768605000775 धारक आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी महिलेला आरोपी ध्रुव याने 9629980953 या मोबाइल नंबरवरून फोन करून फेडेक्स पार्सल ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या पार्सलमध्ये पाच किलो कपडे, सहा इंटरनॅशनल पासपोर्ट, चार एसबीआय क्रेडिट कार्ड, 950 ग्रॅम एमडी हा अंमलीपदार्थ असल्याचे सांगितले. तसच पुढील तपासाच्या नावाखाली मुंबई सायबर क्राईम विभागाशी कॉल कनेक्ट करुन दिला. व्हिडिओ कॉलवरुन फिर्यादी सोबत अजय कुमार बन्सल याने चौकशी करुन त्यांनतर फेडेक्स पार्सल प्रकरणबाबत मुबंई सायबर क्राईमचे डी. एस. स्वामी यांनी फिर्यादीकडे अकाऊंट बाबत चौकशी केली. फिर्यादीसोबत मोठ्या आवाजात बोलणे करुन गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत आयसीआयसीआय बँकेत पर्सनल लोन काढण्यास भाग पाडले. त्यांनंतर फिर्यादी महिलेस आयसीआयसीआय बँकेचा 768605000775 हा खाते क्रमांक देऊन त्यावर नऊ लाख 82 हजार 106 रुपये पाठवण्यास लावून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.