गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा कौटुंबिक स्नेहमेळावा संपन्न

0
66
  "कामगार ज्याप्रमाणे कारखान्यात नवनिर्मितीचे काम करतो,त्याच प्रकारे तो  राष्ट्र घडविण्याचे काम करत असतो,स्वतःच्या परिवाराचा विचार न करता तो रंजल्या-गांजल्यासाठी समर्पित भावनेने काम करतो.आपल्या या कर्तबगारीमुळे आपणास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा "गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार" प्राप्त झाला, याची जाणीव ठेवून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संघटितपणे काम करा.त्यामुळे समाजाची उन्नती होईल आणि मनाला समाधान मिळेल".

 असे अनमोल विचार टाटा मोटर्स कंपनीचे माजी महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.

  गुणवंत कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य,पिंपरी-चिंचवड शहर शाखा यांनी आयोजित केलेल्या गुणवंत कामगार कौटुंबिक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

    मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण l मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते ll श्रीसंत तुकाराम महाराजांचा हा दाखला देत पारळकर पुढे म्हणाले,"मन प्रसन्न असेल, तर जीवनात चैतन्य निर्माण होते आणि ते चैतन्य केवळ आपले स्वतःचे जीवन प्रसन्न करत नाही, तर आपल्या परिवाराचेही जीवन सुंदर बनवते. त्यासाठी मनमोकळेपणाने कार्यरत रहा,नवनवीन गोष्टीचा आनंद घ्या."

 संभाजीनगर, चिंचवड येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विजयकुमार पाटील,वृक्षमित्र अरुण पवार, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा तथा प्रमुख निमंत्रक डॉ.भारती चव्हाण उपस्थित होते.

 मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.ह.भ.प. यादव तळोले,रामदास मांदळे,तानाजी एकोंडे, आण्णा गुरव आणि सहकाऱ्यांनी सुश्राव्य असे भजन आणि नेहा साळुंके हिने स्वागत गीत सादर केले.

  शहराध्यक्ष महंमदशरीफ मुलाणी यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर समाजाभिमुख कार्य करणाऱ्या संस्थांचा शॉल,श्रीफळ,पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.त्यामध्ये "प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती" आणि "शब्दधन काव्यमंच" पिंपळे गुरव यांचा समावेश होता.कामगार भूषण डॉ. मोहन गायकवाड (टाटा मोटर्स),गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त श्रीकांत कदम, प्रवीण वाघमारे,संदीप पोलकम,संगीता जोगदंड,रेणुका हजारे आणि सायली सुर्वे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याशिवाय शंकर नाणेकर (महिंद्र सीआयइ), राकेश देशमुख (टाटा मोटर्स), वसंत नांदुरके (टाटा मोटर्स), किरण देशमुख(अल्फा लावल), काळूराम लांडगे (पुणे परिवहन महामंडळ), अशोक यादव (बजाज ऑटो), भगवान श्राध्दे (निवृत्त कर्मचारी) रामदास मांदळे (आदर्श सरपंच) नितीन यादव (टाटा मोटर्स) यांचाही शॉल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

 डॉ.विजयकुमार पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, "कामगार हा केवळ श्रमजीवी नसतो, तर तो सामाजिक जडणघडणीतला महत्त्वाचा दुवा असतो. समाजाबरोबरच तो स्वतःच्या कुटुंबाचा आणि राष्ट्राचाही विकास घडवून आणतो".

 मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण आपल्या भाषणात म्हणाल्या की,"कामगार कार्यकर्त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली.त्यामुळे गुणवंत कामगारांच्या कार्याची व्याप्ती वाढेल आणि ते अधिक सक्षमतेने काम करू शकतील."

 गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे ध्येयधोरण आणि कामकाजाविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की,"आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गुणवंत कामगारांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून कामगार कुटुंबीय,पर्यावरण,प्रदूषण आणि वृक्ष संवर्धन या कार्यक्रमास प्राधान्य देण्यात येणार आहे.शासनप्रणित कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून जे उपक्रम राबविले जातात,त्याचा लाभ कामगार आणि कामगार  कुटुंबीयाना मिळवून देण्याचाही प्रयत्न केला जाईल.त्यासाठी सर्व स्तरातील कामगारानी एकजुटीने आणि समर्पित भावनेने काम करावे".ही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

 नियोजित वेळेप्रमाणे येथे काही कामगारांनी आणि परिवारातील सदस्यांनी विविध गुणदर्शन केले.त्यामध्ये गायक सुभाष चव्हाण,कु.नेहा साळुंखे,रेणुका हजारे, अनुराधा शिंदे,भरत बारी,श्रुती गायकवाड,महेंद्र गायकवाड,अंबादास दर्वेशकर यांनी चित्रपट गीते सादर केली.लक्ष्मण इंगवले यांनी स्वरचित कविता सादर केली.शार्दुल भाईगडे या आठ वर्षाच्या मुलाने छ.शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.संगीता भंडारी यांनी रमाबाईचे एकपात्री नाट्य सादर केले.या सर्वांच्या सादरीकरणास उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

  मंडळाचे सचिव राजेश हजारे यांनी प्रवेशद्वारापासून प्रमुख व्यासपीठापर्यंत काढलेल्या नक्षीदार रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्टेज सजावटही अतिशय आकर्षक केली होती. 

    कार्यक्रमास कोअर कमिटीचे उपाध्यक्ष तानाजी एकोंडे,सचिव राजेश हजारे, सहसचिव संजय गोळे, कोषाध्यक्ष भरत शिंदे,सहकोषाध्यक्ष गोरखनाथ वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख आण्णा जोगदंड, कामगार भूषण डॉ.मोहन गायकवाड,ह.भ.प.अशोक महाराज गोरे,पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे,शब्दधन काव्यमंचचे संस्थापक/अध्यक्ष सुरेश कंक,मुरलीधर दळवी,शामराव सरकाळे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व गुणवंत कामगार उपस्थित होते.

 तुकाराम महाराजांसारखा पेहराव परिधान करून आण्णा जोगदंड यांनी प्रवेशद्वारापाशी पाहुण्यांचे स्वागत केले.संगीता जोगदंड, कल्पना भाईगडे,रेणुका हजारे यांनी पाहुण्यांना कुमकुम तिलक लावून औक्षण केले.शहराध्यक्ष महंमदशरीफ मुलाणी,सतीश देशमुख, ज्ञानेश्वर मलशेट्टी, अशोक यादव,आण्णा गुरव, सुनील आधाटे,अशोक सरतापे,चंद्रकांत लव्हाटे,उद्धव कुंभार,लक्ष्मण इंगवले आदी पदाधिकाऱ्यानी कार्यक्रमाचे संयोजन केले. कवी आणि प्रसिद्ध निवेदक भरत बारी यांनी बहारदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची उंची वाढविली. बाळासाहेब साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.