गुड न्यूज, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आवश्यक लिथियमचा मोठा साठा जम्मू- कश्मिरमध्ये

0
230

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) : सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा ओघ वाढू लागला आहे आणि त्या दृष्टीने भारतासाठी एक गुड न्यूज आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम या धातुचा वापर केला जातो. आणि भारत या धातुसाठी चीन, ऑस्ट्रेलियावर अवलंबून आहे. पण, नुकतेच भारतात लिथियमचा मोठा साठा सापडल्याचे समोर आले आहे.

भारताच्या खाण मंत्रालयाच्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमचे मोठे साठे सापडले आहेत. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) ने हे साठे शोधले आहेत. जीएसआयने दिल्लीच्या उत्तरेस 650 किमी अंतरावर जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात 5.9 दशलक्ष टन लिथियमचा साठा शोधला आहे.

खाण मंत्रालयाच्या माहितीनुसार लिथियम आणि सोन्यासह 51 खनिज ब्लॉक राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आले आहेत. या 51 खनिज ब्लॉकपैकी 5 ब्लॉक सोन्याशी संबंधित आहेत. जम्मू काश्मीर (केंद्रशासित प्रदेश), आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक या 11 राज्यांमध्ये पसरलेले इतर ब्लॉक पोटॅश, मॉलिब्डेनम, बेस मेटल इत्यादी वस्तूंशी संबंधित आहेत. GSI ने हे ब्लॉक्स 2018-19 च्या फील्ड सीझन पासून केलेल्या कामांच्या आधारे तयार केले होते.

लिथियम महत्वाचा धातू
लिथियम हा एक धातू आहे ज्याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. मोबाईल लिथियम बॅटरीचा वापर होतो. सध्या केंद्र सरकारही सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यासाठी लिथियमचा साठा असणे अत्यंत आवश्यक आहे.सध्या, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे जगभरात लिथियमचे प्रमुख पुरवठादार आहेत. त्यांच्याकडे असलेल्या लिथियमच्या प्रचंड साठ्यामुळे ते त्यांना हवे ते करतात. पण, आता भारतातही लिथियम सापडल्यानंतर या देशांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

दरम्यान, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ची स्थापना 1851 मध्ये रेल्वेसाठी कोळशाचे साठे शोधण्यासाठी करण्यात आली होती. तेव्हापासून GSI ही संस्था देशातील विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक भूवैज्ञानिक माहिती पुरवते. या संस्थेला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भूवैज्ञानिक संस्थेचा दर्जाही प्राप्त झाला आहे.