गुजराथ विधानसभा निवडणुकिची प्रतिक्षा कायम

0
205

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. आजच गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र आज गुजरातच्या निवडणुकांबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता होती. मात्र आता ही शक्यता मावळली आहे. दरम्यान, गुजराथमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने मोठी वातावरण निर्मिती केल्याने भाजप अत्यंत सावध पावले टाकत असल्याचे सांगण्यात येते.

गुजरातमधील राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधी माहिती आणि अहवाल मागवण्यात आले होते. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. गुजरातमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. आता यंदाच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गुजरातमध्ये यंदा सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेससह आम आदमी पक्ष देखील मोठ्या ताकतीनं मैदानात उतरले आहेत.

सध्या गुजरातमध्ये एकूण 182 जागा आहेत. बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे. गुजरातमध्ये सध्या 4 कोटी 46 हजार 956 रजिस्टर्ड मतदार आहेत. 2017 साली झालेल्या निवडणुकीत 69.01 टक्के मतदान झाले. 182 जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत 13 जागा अनुसुचीत जागांसाठी, 27 जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.