गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे

0
295

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – वेदांता आणि फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यावरून राजकारण तापले आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच हैराण करून सोडले आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या घडामोडींमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. वेदांता गुजरातमध्ये गेला म्हणजे पाकिस्तानला गेला नसून, गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे अशी आठवण त्यांनी विरोधकांना करून दिली आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोणतेही अनुदान घेण्यासाठी 10 टक्के कमिशन द्यावे लागत होते, असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नाव न घेता फडणवीस यांनी पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ठाकरे सरकारने राज्यातील रिफायनरीसारख्या मोठ्या प्रकल्पांना विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत 10 वर्षे पुढे जाऊ शकला असता, असे ते म्हणाले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि मुंबई मेट्रो-३ प्रकल्प रखडल्याचा आरोप फडणवीस यांनी ठाकरेंवर केला आहे.

फडणवीस म्हणाले की, जूनच्या अखेरीस उपमुख्यमंत्री होताच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची भेट घेतली होती. त्याचवेळी महाराष्ट्राने गुजरातप्रमाणेच कंपनीकडे प्रस्ताव ठेवला होता, मात्र गुजरातमध्ये सेमीकंडक्टर युनिट उभारण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

महाविकास आघाडी सत्तेत असताना (नोव्हेंबर 2019 ते जून 2022) थेट विदेशी गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र गुजरातच्या मागे होता. येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊ असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गुजरात हा पाकिस्तान नसून ते राज्य म्हणजे महाराष्ट्राचा भाऊ आहे.