गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त

0
234

अहमदाबाद, दि. १० (पीसीबी) : गुजरातमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली असून २०० किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गिअर बॉक्समध्ये लपवून दुबईहून हे ड्रग्ज भारतात आणले जात असताना गुजरात एटीएस आणि डीआरआयने ही कारवाई केली आहे. हे ड्रग्ज फेब्रुवारी महिन्यात दुबईहून कोलकत्ता येथे आणण्यात आलं होतं. त्यानंतर राबवलेल्या तपासात ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, तब्बल १२ गिअर बॉक्समध्ये हे ड्रग लपवण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. दुबईच्या जेबेल अली पोर्टवरून हे ड्रग पाठवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली असून सहा महिन्याच्या तपासानंतर यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २०० किलो ड्रग गुजरात एटीएसने ताब्यात घेतलं आहे.

गुजराथमधील बंदरांवर वारंवार ड्रग्ज सापडत असल्याने आता राजकीय वर्तुळातून भाजपावर टीकेची झोड सुरु झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजपाच्या बड्या नेत्याकडे बोट दाखविल्याने हा विषय आता अधिक गंभीर होत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांत किमान सात वेळा ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून त्याची आंतारराष्ट्रीय बाजारातील किंमत शेकडो कोटींमध्ये असल्याचे सांगण्यात येते आहे.