गुजरातचे माजी मंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी घेतला पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभांचा आढावा

0
101

पिंपरी, दि. 0५ (पीसीबी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुजरातचे माजी गृहमंत्री तथा प्रवासी प्रभारी नेता प्रदीपसिंह जडेजा यांनी आज पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभांचा आढावा घेतला. तसेच, पक्षाने केलेली विकासकामे, पक्षाची बूथ रचना, मतदार नोंदणी याबाबत माहिती घेवून तिनही विधानसभा निहाय पदाधिका-यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी, शहराच्यावतीने शंकर जगताप यांनी श्री. जडेजा यांचे स्वागत केले.

यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेशदादा लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार उमाताई खापरे, समन्वयक राम गावडे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, संतोष कलाटे, महेश कुलकर्णी,‍ सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, पिंपरी विधानसभा संयोजक संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैला मोळक, चिंचवड विधानसभा संयोजक काळूराम बारणे, भोसरी विधानसभा संयोजक विकास डोळस, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे यांच्यासह कोअर कमिटी सदस्य, माजी नगरसेवक – नगरसेविका, विविध मोर्चा अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. प्रदीपसिंग जडेजा यांच्यावर महाराष्ट्रातील मावळ, पिंपरी, चिंचवड, भोसरी, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, खेड या ८ विधानसभा मतदार संघाची प्रवासी प्रभारी नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या बैठका मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालय, हॉटेल कलासागर येथे घेण्यात आल्या.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात भाजपनेच मोठा लीड राखला. यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून देवून काम केले. आजही तिनही मतदारसंघात भाजपाची पकड मजबूत असून, आगामी निवडणूकीत मोठया मताधिक्याने भाजपसह महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

श्री. जडेजा यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसोबत चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची बुथ रचना, मतदार नोंदणी संदर्भात आढावा घेतला. पक्षाची ध्येय धोरणे, महायुती सरकारने अर्थसंकल्पात जनतेशी संबंधित घेतलेले निर्णय व योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून बुथ रचना मजबूत करण्यासोबतच जास्तीत जास्त मतदार नोंदणी आणि दुरुस्ती करण्याची सूचना देखील त्यांनी केली. त्याचप्रमाणे राज्यातील महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षात तीन सिलेंडर मोफत योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनासह केंद्र आणि राज्याच्या सर्व योजना प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. तसेच,‍ विरोधकांच्या फेक नरेटीव्हला जशास तसे उत्तर द्या, असेही त्यांनी सांगितले.