वाकड, दि. २४ (पीसीबी) – गुगलवर बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधणे एका सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तींनी सेवानिवृत्त व्यक्तीला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर बँकेची गोपनीय माहिती घेत व्यक्तीच्या बँक खात्यातून नऊ लाख 99 हजार 324 रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा वाजताच्या कालावधीत वाकड येथे घडली.
याप्रकरणी 64 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना डोंबिवली कल्याण येथील त्यांचे घर विकायचे असल्याने त्यांना कॅनरा बँकेच्या डॉकयार्ड रोड मुंबई येथून लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट पाहिजे होते. त्यामुळे फिर्यादी यांनी गुगलवर कॅनरा बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधला. त्यावर फोन केला असता फोनवरील व्यक्तीने आमच्या वरिष्ठांची बोला असे म्हणून दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला फोनवर बोलण्यास सांगितले. त्यानंतर फोनवरील अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस व्हाटसअप कॉल करतो असे सांगून त्यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करण्यास सांगून त्यांना बँकेची गोपनीय माहिती त्या अॅपमध्ये भरण्यास सांगितली. त्यानुसार फिर्यादी यांनी माहिती भरली असता त्यांच्या बँक खात्यातून 9 लाख 99 हजार 324 रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.