पिंपरी, दि. १३ (पीसीबी) -चिटफंड मध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला दोन टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दोघांनी एका डॉक्टरांना ३५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याबदल्यात त्यांना १५ हजार रुपये परतावा देऊन उर्वरित रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार २२ मार्च २०१९ ते १२ जुलै २०२२ या कालावधीत रहाटणी येथे घडला.
डॉ. अशोक कृष्णा भोंडवे (वय ६२, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल सोमशेखरन नायर (वय ५३), महिला (वय ४२, दोघे रा. विजयनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन ते चिटफंडचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. चिटफंड मध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याला दोन टक्के परतावा देतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतले. दरम्यान फिर्यादी यांना आरोपींनी परतावा म्हणून केवळ १५ हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम फिर्यादी यांना परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.