गुंतवणुकीच्या बहाण्याने लोकांना लाखोंचा गंडा घालणारा ठग गजाआड

0
147

स्वतःचा चांगला व्यवसाय असताना लोकांना फसवून त्यांच्या नावे लाखो रुपयांची कर्ज घेऊन फसवणूक करणा-या ठगाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने 15 जणांची 8 कोटी 23 लाख 25 हजार 211 रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले आहे. अमित शामराव माने (वय 36, रा. माण, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी अमित माने याची स्वतःची टेकरिचेस प्रा ली नावाची कंपनी असून त्या अंतर्गत त्याचा ई लर्निंग कंटेंड डेव्हलपमेंट सर्विस देण्याची व की बोर्ड तसेच संबंधित पुस्तके वितरण करण्याचा वयवसाय आहे. असे असताना त्याने मंगेश दळवी (वय 44, रा. रहाटणी) यांना माझ्या व्यवसाय गुंतवणूक करा. मी तुम्हाला दोन ते तीन टक्के अधिक फायदा करून देतो असे सांगून त्यांना 54 लाख 10 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे पैसे अथवा त्यावरील नफा न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी अमित माने याने एकूण सात मोबाईल सीमकार्ड वापरले होते. प्रत्येक वेळी नवीन सीम आणि नवीन मोबाईल असल्यामुळे पोलिसांना तो मिळून येत नसे. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात तो लातूर येथे असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी त्याला लातूर येथून ताब्यात घेतले.

त्याने मंगेश दळवी यांच्यासह 15 जणांची एकूण 15 जणांची 8 कोटी 23 लाख 25 हजार 211 रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले आहे. चांगल्या जीवनशैलीचे आणि नफ्याचे आमिष दाखवून तो लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्याच्या जीवनशैलीवरून लोक देखील त्याला बळी पडत होते. त्यानंतर तो व्यवसायात गुंतवणूक करण्याची नागरिकांना ऑफर देत असे. पैसे नाहीत असे कारण सांगितल्यास तो त्यांच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणावरून वैयक्तिक कर्ज काढत असे. त्यानंतर सर्व रक्कम तो व्यवसायाच्या निमित्ताने तो स्वतःकडे ठेऊन घेत असे.

अशा प्रकारे त्याने इतर लोकांसह नात्यातील लोकांना देखील फसवले होते. हे पैसे त्याने स्वतःच्या कर्जाचे हप्ते भरणे, मौजमजा करणे आणि जागा घेण्यासाठी वापरले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, मंगेश सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.