पिंपरी दि. १ (पीसीबी) -कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सन 2019 ते सन 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र आनंदराव पाटील (वय 46, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल गुलाबसिंग जाखड (रा. चिंचवड) आणि जेबीसी कॅपिटल प्रा ली चे इतर संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याने फिर्यादी यांना कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा करून देतो, असे आमिष दाखवले. आरोपीवर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी 35 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपींनी फिर्यादी यांना परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली.
दुसऱ्या प्रकरणात रवींद्र मुरलीधर हगवणे (वय 46, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल गुलाबसिंग जाखड, रामहरी ज्ञानदेव मुंढे, सुनील जनार्दन झांबरे, माधव रघुनाथ चासकर, विश्वास रामचंद्र भोर, नवनाथ एकनाथ रेपाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा महिन्यात दहा टक्के परतावा योजनेत आणि सहा महिन्यात दाम दुप्पट मुदत ठेवीच्या योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने साडेसात लाख रुपये गुंतवणूक केली. त्यांना 12 लाख 31 हजार 600 रुपये एकूण परतावा देणे आवश्यक असताना आरोपींनी तो न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.