गुंतवणुकीच्या बहाण्याने 58 लाख रुपयांची फसवणूक

0
245

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – कंपनीत पैसे गुंतवल्यास दाम दुप्पट आणि सोन्याच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पाच जणांनी एकाची फसवणूक केली. हा याप्रकारे 9 मे 2019 ते 17 जुलै 2022 या कालावधीत शास्त्री चौक भोसरी आणि कनक ज्वेलर्स अंधेरी मुंबई येथे घडला.

अशोक कैलास करडुले (वय 31, रा. आळंदी देवाची) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुनिंद्र मिलींद तुळवे (रा. वडाळा मुंबई), एक महिला, संदिप मोहिते (रा. फलटण), सनी इंगळे (रा. वाकड), पारस जैन (रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुनिंद्र आणि महिलेने त्यांच्या रिच हेल्प क्लब कंपनीत पैसे गुंतवल्यास दाम दुप्पट पैसे देतो असे फिर्यादी करडुले यांना सांगितले. आरोपी संदीप, सनी आणि पारस यांनी सोन्यामध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळतो असे फिर्यादी यांना आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी आरोपींना चेक, आरटीजीएस आणि गुगल पे द्वारे रिच हेल्प क्लबमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 41 लाख आणि सोने खरेदीमध्ये गुंतविण्यासाठी 17 लाख रुपये दिले. एकूण 58 लाख रुपये आरोपींनी घेतले. त्यानंतर ते पैसे आणि त्याच्या परतावा न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.