गुंडागर्दी मोडित काढण्यासाठी पुणे पोलिसांची धडक कारवाई

0
80
  • एकाच दिवसात 43 गुंडांना अटक

पुणे, दि. २२ – पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या परिमंडळ 1 अंतर्गत एका दिवसात तब्बल 43 गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा असून, या कारवाईमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा हालचाली वाढल्या असून, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः नानापेठ भागात झालेल्या कोमकर-आंदेकर गँगच्या गोळीबारामुळे पुणे शहर हादरले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती.

परिमंडळ 1 चे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली. या पथकाने मात्र 24 तासांत 43 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनेकजण हे शहरातील कुख्यात आंदेकर गँगचे सदस्य असून, काहींवर खून, हत्या प्रयास (कलम 307), दारूबंदी कायदा, शस्त्रबंदी कायदा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नवरात्रीच्या काळात कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख रोखण्यासाठी, विशेषतः टोळ्यांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांची ही मोहीम आहे.

काही दिवसांपूर्वीच घायवळ टोळीकडून गोळीबार
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीने भर रस्त्यात प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार केला. फक्त गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला हा हल्ला इतका गंभीर होता की शहरात एकच खळबळ उडाली. यानंतर या टोळक्याने वैभव साठे या नागरिकावरही कोयत्याने हल्ला केला. सागर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या वैभव यांच्यावर “आम्ही इथले भाई आहोत” म्हणत टोळीतील गुंडांनी दहशतीचा इशारा देत हल्ला केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला होता. यानंतर पोलिसांकडून टोळ्यांवर कारवाई केली जात आहे.

गणेश पेठेत अतिक्रमणविरोधी कारवाई
पुण्यातील गणेश पेठेत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाई करण्यात येतेय. अतिक्रमणांमध्ये मागील वर्षी हत्या झालेले माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या संपर्क कार्यालयाचा समावेश आहे. या ठिकाणी कारवाईसाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.