गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यासाठी 1 हजार 225 अर्ज दाखल

0
286

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी पद्धतीने नियमित करण्यासाठी 20 डिसेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत महापालिकेकडे 1 हजार 225 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील नियमात बसणाऱ्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना गुंठेवारीनुसार अधिकृत बांधकामाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दरम्यान, गुंठेवारीसाठी पुणे महापालिकेने मुदत दिली असताना पिंपरी महापालिकेने मुदतवाढ दिली नाही.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महापालिका हद्दीतील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 मध्ये सुधारणा करून अधिनियम 12 मार्च 2021 ला आणि शुल्क निश्‍चितीचा आदेश 18 ऑक्टोबर 2021 ला काढला आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहेत. महापालिकेने 20 डिसेंबर पासून नियमितीकरणासाठी नागरिकांकडून अर्ज मागविले होते. प्रतिसाद कमी मिळाल्याने दोनवेळा मुदतवाढ दिली.

30 जून 2022 पर्यंतच्या मुदतीमध्ये 1 हजार 225 अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जाचे क्षेत्रीय कार्यालयानिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. नियमात बसणाऱ्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना गुंठेवारीनुसार अधिकृत बांधकामाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे सर्व कामकाज ऑनलाइन माध्यमातून चालणार आहे. आलेल्या अर्जावर कार्यवारी तातडीने सुरू केली जाणार असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.