गुंजवणी धरणात दुर्दैवी घटना! विद्युत धक्क्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

0
1

दि.१३ (पीसीबी) -राजगड तालुक्यातील घेवंडे गावावर शोककळा पसरवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुंजवणी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मृतांची ओळख दामाजी भाऊराव गायकवाड (वय ५०) आणि दत्तात्रेय उर्फ दत्तू भाऊराव गायकवाड (वय ५५) अशी पटली आहे. दामाजी गायकवाड हे निव्ही-घेवंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते.

रविवारी दुपारी दोघे भाऊ शेतीसाठी कृषिपंप बसवण्याचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे तोल जाऊन ते थेट धरणाच्या खोल पाण्यात कोसळले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. वेल्हे पोलिसांनी तातडीने हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. रविवारी सायंकाळी दामाजी गायकवाड यांचा मृतदेह सापडला, मात्र अंधारामुळे दुसऱ्या भावाचा शोध थांबवण्यात आला.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. स्कुबा डायव्हर ऋषिकेश शिवतारे यांनी अवघ्या २१ मिनिटांत धरणातील कपारीत अडकलेला दत्तात्रेय गायकवाड यांचा मृतदेह शोधून काढला.या बचावकार्यात तानाजी भोसले, गणेश सपकाळ, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामने यांच्यासह इतर सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.