गावात अफवा पसरवण्याच्या संशयावरून एकास बेदम मारहाण

0
98

मरकळ, दि. १९ (पीसीबी) – गावात मुली बद्दल वेगळी चर्चा करून अफवा पसरवली, असा संशय घेत सहा जणांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. ही घटना 16 मे रोजी दुपारी खेड तालुक्यातील मरकळ गावात घडली.

स्वप्निल किसन भुसे (वय 32, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय नवनाथ लोखंडे, अमित नवनाथ लोखंडे, पंकज भाऊसाहेब साळुंखे, अविनाश बाळासाहेब लोखंडे, गौतम लालचंद्र लोखंडे, प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (सर्व रा. मरकळ, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील भुसे हे मरकळ गावात एका चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी आरोपी अक्षय लोखंडे तिथे आला. त्याने ‘तू माझी गावात मुली बाबत वेगळी चर्चा करून अफवा पसरवतो’ असे म्हटले. त्यावर स्वप्निल यांनी ‘मी तुझी कोणतीही चर्चा करून अफवा पसरवली नाही’ असे सांगितले. अक्षय लोखंडे याने वाळलेली नारळाची फांदी स्वप्नील यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर अक्षय हा तिथून निघून गेला. काही वेळाने तो इतर आरोपींसह तिथे आला. आरोपींनी लाकडी दांडक्याने स्वप्निल यांना बेदम मारहाण केली. तसेच आम्ही जेलमध्ये जाऊन परत आल्यावर तुझ्याकडे बघू. तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.