पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर खंडणी विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पुणे मुंबईत द्रुतगती मार्गालगत शिरगाव येथे करण्यात आली.
पोलीस नाईक आशिष बोटके यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन भिजत घातले. महिलेने गावठी दारूची भट्टी लावल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे तीन हजार लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.