पिंपरी, दि. १३ – “मी भीमरायाचा वाघ आहे”, “नांदनं… नांदनं… माझ्या भीमाचं नांदनं”, “दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भूमीवर”, “सोनियाची उगवली सकाळ” आणि “आहे कोणाचं योगदान… लाल दिव्याच्या गाडीला” अशा विविध गाण्यांच्या ठेक्यावर पिंपरीतील भीमसृष्टी मैदानात एक वेगळेच चैतन्य अनुभवाला आले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात असलेल्या गोडीने आणि प्रभावीतेने हजारोंच्या जनसमुदायाला एकत्र आणले ज्यात युवक, महिला आणि वृद्ध सगळेच सामील झाले होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ११ ते १६ एप्रिल २०२५ रोजी ‘विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील (भीमसृष्टी) मैदानात करण्यात आले आहे. शनिवार १२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा महामानवांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम याठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमास अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन,कार्यकारी अभियंता सतिश वाघमारे,क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कामगार नेते गणेश भोसले,तुकाराम गायकवाड,उपअभियंता चंद्रकांत कुंभार तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावली होती. सायंकाळी ७ वाजल्यापासूनच मैदानात गर्दी होऊ लागली आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला मैदान श्रोत्यांनी भरून गेले होते. या सांस्कृतिक सत्रात आनंद शिंदे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित अनेक गीते सादर केली.
कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांनी बाबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक योगदानाची आठवण करून दिली. गाण्यांमधून त्यांनी सामाजिक समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. विशेषतः नव्या पिढीपर्यंत डॉ. आंबेडकरांची शिकवण पोहोचवणे, हा उद्देश त्यांनी आपल्या सादरीकरणातून अधोरेखित केला. ‘विचार प्रबोधन पर्वाचा उद्देश सामाजिक सुधारणांचे महत्त्व आणि महामानवांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे असून, सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाने त्या उद्दिष्टाला प्रभावीपणे हातभार लागला.
दरम्यान, महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून १५ एप्रिलपर्यंत विविध सांस्कृतिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी येथे करण्यात आले आहे.
महापालिका आणि रमाई स्मारक समितीच्या वतीने रक्तदान, आरोग्य शिबीर
पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील (भीमसृष्टी) मैदानात प्रबोधन पर्वानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका आणि त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने रक्तदान तसेच आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या वतीने रक्तदान शिबीराचे तसेच जिजामाता रुग्णालयाच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.