गाड्या वेळेवर सोडा, थांबे द्या; पुणे-लोणावळा दरम्यान दुपारीही लोकल सुरु करा – श्रीरंग बारणे

0
261

पुणे, दि. १९ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात रेल्वे विभागाची अनेक कामे चालू आहेत. शेलारवाडी, वडगाव, कामशेत, मळवली येथील रेल्वेची काम अतिशय संथगतीने सुरु आहेत. रेल्वे अंडरपास, ओव्हर ब्रीजच्या कामाला गती देवून कामे पूर्ण करावीत. तिस-या आणि चौथ्या ट्रॅकबाबत रेल्वेने पुढील कार्यवाही तत्काळ सुरु करावी. पुणे-लोणावळा दरम्यान दुपारी 1 ते 2 या वेळेत ही लोकल सेवा सुरु करावी. लोकला थांबे द्यावेत. गाड्या वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्य रेल्वे विभागाच्या बैठकीत केली.

मध्य रेल्वे विभागाची बैठक पुणे विभागीय कार्यालयात झाले. या बैठकीस खासदार बारणे यांच्यासह पुणे, सोलापूर विभागातील खासदार, मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक अनिल कुमार लाहोटी, पुणे विभागीय अधिकारी रेणू शर्मा संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातील प्रलंबित कामाचा आढावा घेण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर दुपारी एक ते दोन या वेळेत लोकल चालू करण्याची मागणी केली. लोणावळा, भागरवाडी, कामशेत, वडवळे, जांभूळ, वडगाव, शेलारवाडी येथील ‘एफओबी’, ‘आरओएफ’च्या कामांची माहिती घेण्यात आली. आकुर्डी आणि चिंचवड स्टेशनवर लिप्ट बसविण्यात यावी. आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण व आधुनिकरण करावे. चिंचवडही श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांची पूण्यभूमी आणि क्रांतिकारक चापेकर बंधुंची भूमी आहे. चिंचवड रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करावे. मोरया गोसावी, चापेकर बंधुंची माहिती प्रवाशांना द्यावी.

वडगांव, कामशेत,शेलारवाडी, जांभुळ, वडवळे, नायगाव या ठिकाणी चालू असलेले अंडर पासची कामे तात्काळ पूर्ण करावीत. त्या कामांना गती द्यावी. वडगाव केशवनगर येथील लाईट शिफ्टिंगचे काम पूर्ण करावे. देहूरोड येथील पुलाचे काम पूर्ण करावे. सह्याद्री व सिंहगड एक्सप्रेसला पूर्वी प्रमाणे दोन डबे जोडण्यात यावे. कोरोना काळात लांब पल्यांच्या गाड्याचे थांबे बंद केले आहे ते या पुन्हा सुरू करावेत. खासगी कंपन्यांकडून सीएसआर फंड घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघात येणा-या सर्व रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करावे. स्टेशन परिसरात स्वच्छता ठेवावी, अशी मागणीही खासदार बारणे यांनी बैठकीत केली.

गाड्या वेळेवर सोडा, थांबे द्या!
मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक नोकरीसाठी पुणे, मुंबईला जातात. मतदारसंघात शासकीय नोकरदारांचे प्रमाण जास्त आहे. अनेकजण मुंबईतील मंत्रालयासह विविध शासकीय कार्यालयात कार्यरत आहेत. रेल्वे गाड्या वेळेवर सुटत नसल्याने नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी विलंब होतो. त्यांना धावतपळत कार्यालयात पोहोचावे लागते. त्यासाठी रेल्वे गाड्या वेळेवर सोडाव्यात. गाड्याचा वेळेत बदल असेल तर नागरिकांना अगोदर पूर्वकल्पना द्यावी. एक्सप्रेस गाड्यांचे थांबे वाढवावेत. महत्वाच्या स्थानकावर गाड्यांना थांबे द्यावेत, अशी सूचना वजा मागणी खासदार बारणे यांनी बैठकीत केली.