गाडीला कट मारल्याचा जाब विचारल्याने दोघांना दमदाटी

0
436

आळंदी, दि. २६ (पीसीबी) – दुचाकीला कट मारल्याने त्याचा जाब विचारला असता कार चालकाने दुचाकीवरील दोघांना दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच कोयत्याच्या धाकाने मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 24) सायंकाळी सात वाजता केळगाव रोडवर आळंदी येथे घडली.

गौरव भूमकर (रा. चिंबळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम अशोकराव लोंढे (वय 19, रा. आळंदी. मूळ रा. परभणी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र गोकुळ गाडे हे दुचाकीवरून भाजीपाला घेण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी कार चालकाने फिर्यादी यांच्या दुचाकीला कट मारला. त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपीने फिर्यादी यांना दमदाटी केली. मी गौरव भूमकर आहे. मला चिंबळीचा गौरव भाई म्हणतात, असे म्हणत फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर कारमधून कोयता काढून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.