गाडीत झोपलेल्या चालकास लुटले

0
387

रावेत, दि. २३ (पीसीबी) – रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून गाडीत झोपलेल्या चालकाला चार जणांनी लुटले. गाडीतून ३१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. १८) पहाटे बेंगलोर-मुंबई महामार्गावर रावेत येथे घडली.

मंगल धनाजी चौधरी (वय ४९, रा. पालघर) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २२) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या सोबत असलेला हमाल असे दोघेजण गाडीत झोपले होते. त्यावेळी तीन ते चार अनोळखी इसम गाडीच्या केबिनमध्ये चढून आले. त्यांनी दोन मोबाईल फोन, ड्रायव्हिंग लायसन्स, रोख रक्कम असा एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. दरम्यान चोरट्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या सोबत असलेल्या हमालास मारहाण केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.