गाडीची चावी मागण्यावरून तरुणावर कोयत्याने वार

0
491

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरीतून भोसरीला जाण्यासाठी निघालेल्या तरुणाला चार अल्पवयीन मुलांनी गाडीची चावी मागण्याच्या कारणावरून मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री अकरा वाजता आंबेडकर चौक, पिंपरी येथे घडली.

मनोज करण सिंग (वय 22, रा. भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अल्पवयीन मुले आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पिंपरी मधून भोसरीकडे जात होते. ते आंबेडकर चौक येथे आले असता त्यांना अल्पवयीन मुलांनी गाडीची चावी मागितली. त्यावरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी फिर्यादी यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच कोयत्याने फिर्यादी यांच्या हाताच्या पोटरीवर, डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.