गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटात गोडसेचे उदात्तीकरण – तुषार गांधी

0
323

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : महात्मा गांधी यांचे पुतणे तुषार गांधी यांनी नुकतीच दिग्दर्शक राजकुमार संतोषींच्या ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. महात्मा गांधी आणि नुथराम गोडसे यांच्या विचारधारेतील युद्धाची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. मात्र तुषार गांधी यांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. ज्या चित्रपटात मारेकऱ्याचं उदात्तीकरण केलं जातं, असा चित्रपट पाहण्याची इच्छा नाही, असंही ते म्हणाले.

स्वातंत्र्यानंतरचा 1947-48 चा कालावधी या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 1948 मध्ये महात्मा गांधींना मारण्यामागील नथुराम गोडसेची बाजू आणि विचारधारेतील फरक यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना तुषार गांधी म्हणाले, “मला आश्चर्य नाही वाटत, कारण त्यांच्यासाठी गोडसे हा हिरो आहे आणि जर ते त्याला हिरोसारखं दाखवत असतील तर त्याचं कोणालाच आश्चर्य वाटू नये. पण मी या चित्रपटाच्या गुणवत्तेवर आणि त्यातील दोषांबद्दल भाष्य करू शकत नाही, कारण तो मी अजून पाहिलाच नाही. ज्या चित्रपटामागे मारेकऱ्याचा गौरव करण्याचा हेतू असेल, तर असा चित्रपट मी पाहू इच्छित नाही.”

“हा अत्यंत विचारपूर्वक केलेला गेम प्लॅन आहे आणि त्या सर्व पात्रांना पार पाडण्यासाठी भूमिका देण्यात आल्या आहेत. याच दिग्दर्शकाने याआधी ‘भगत सिंग’ या चित्रपटात बापूंची अत्यंत चुकीची भूमिका दाखवली होती. त्यामुळे ते गोडसेचा गौरव करणारा चित्रपट बनवतील, यात नवल काहीच नाही”, अशीही टीका त्यांनी केली.

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी याआधीच्या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांच्या या चित्रपटात गांधींबद्दल अत्यंत वेगळी बाजू दाखवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर त्यामुळे त्यांना सेन्सॉर बोर्डाचीही भीती होती. “सेन्सॉर बोर्ड कदाचित माझ्या चित्रपटाला प्रमाणपत्र देणार नाही अशी मला भीती होती. पण त्यांनी त्यातील एकही शब्द कट केला नाही”, असं ते म्हणाले होते.

हा चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेते दीपक अंतानी यामध्ये गांधींच्या भूमिकेत आहेत. तर मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात गोडसेची भूमिका साकारतोय.