गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात महिलांचे अथर्वशीर्ष पठण

0
247

पिंपरी,दि. २ (पीसीबी) गणेशोत्सव आणि ऋषिपंचमीचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ रोजी चिंचवडगावातील गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात सुमारे एकवीस महिलांनी सामुदायिक अथर्वशीर्षाचे पठण केले. विधानपरिषद आमदार उमा खापरे, ह.भ.प. वैशाली खोले, सामाजिक कार्यकर्त्या हेमा सायकर, गीतल गोलांडे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उमा खापरे यांनी आपल्या मनोगतातून, “गांधीपेठ तालीम मित्रमंडळाने सातत्याने चव्वेचाळीस वर्षे गणेशोत्सव आणि जिजाऊ व्याख्यानमाला यांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करून समाजासाठी विधायक कामगिरी केली आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. या विविध उपक्रमांमुळे माणसाने नेहमी जमिनीवर चालावे, अशी मौलिक शिकवण त्यांनी दिली आहे!” असे गौरवोद्गार काढले. हेमा सायकर यांनी नियमित अथर्वशीर्ष पठणाचे महत्त्व विशद करून त्यामुळे माणसाला बौद्धिक संपन्नता, मानसिक शांती आणि समाधान लाभते, अशी माहिती दिली. जिजाऊ व्याख्यानमाला महिला सदस्य मनीषा जंगम, नानी रायकर, विमल भोकरे, माया थोरात, रेश्मा जमदाडे, उषा चौधरी, सुजाता गोलांडे यांनी संयोजनात सहकार्य केले.