गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक

0
305

पिंपरी.दि.23 (पीसीबी) – गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. महिलेकडून दोन किलो 40 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 21) दुपारी वाकड येथे करण्यात आली.

आरती अजय चव्हाण (वय 35, रा. बालेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात एक महिला गांजा विक्रीसाठी आली असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून दोन किलो 40 ग्रॅम वजनाचा दोन लाख चार हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. तिने हा गांजा परशुराम तुपेरे (रा. वाकड) याच्याकडून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी परशुराम तुपेरे याच्या विरोधात देखील गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.