वाकड, दि. ८ (पीसीबी) – कार मधून थेरगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. ७) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली. यात नऊ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
राहुल विठ्ठल जाधव (वय २२, रा. गुलबर्गा, कर्नाटक), शालिवान आप्पाराव वाडी (वय ३२, रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील एका हॉस्पिटलसमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एक संशयित कार अडवली. कारची झडती घेतली असता त्यात दोन लाख ३१ हजार ५०० रुपयांचा नऊ किलो ३०० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी कारमधील राहुल आणि शालिवान या दोघांना ताब्यात घेत कार, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गांजा असा एकूण सात लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. राहुल आणि शालिवान हे कर्नाटक येथून गांजा विक्रीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले असल्याचे तपासात समोर आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.