गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

0
262

कुरुळी, दि. २ (पीसीबी) – खेड तालुक्यातील कुरुळी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 509 ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) सायंकाळी करण्यात आली.

दिलीप शामराव जाधव (वय 38, रा. मोशी, पुणे. मूळ रा. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने हा गांजा निगडी येथील एका महिलेकडून आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या महिलेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथे एकजण गांजा विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दिलीप जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 50 हजार 900 रुपये किमतीचा 509 ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 58 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला. दिलीप जाधव याने निगडी येथील एका महिलेकडून हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्या महिलेच्या विरोधात देखील गुन्हा नोंदवला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.