भोसरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला गांजा बाळगल्या प्रकरणी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 16) दुपारी बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी येथे करण्यात आली.
सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी हे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात नेमणुकीस आहेत. बालाजीनगर झोपडपट्टी येथे राहणारी एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले. आरोपी महिलेकडे 21 हजार 375 रुपये किमतीचा 855 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा महिलेने आनंद उर्फ आप्पा काळे (रा. परांडा रोड, कुर्डुवाडी, जि. सोलापूर) याच्या कडून विकत आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.










































