पालघर, दि.02 (पीसीबी)- जव्हार, मोखाडा तालुक्यात गरोदर माता व बाळाचे भविष्य धोक्यात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याठिकाणी पुन्हा एकदा माता व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जव्हारच्या पतंग शहा कुटीर उपजिल्हा रुग्णालयात ही घटना घडली असून मागील आठवड्यापासून दोन माता व दोन बाळांचे मृत्यू झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील कुंता वैभव पडवळे (वय-३१) या मातेला नऊ महिने पूर्ण झाल्याने प्रसूती करिता जव्हार उप जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दाखल करण्यात आले होते. तिचा नियमित उपचार विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात सुरू होते. मात्र येथे सुविधा नाहीत म्हणून जव्हारच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. यानंतर महिलेला पुढील उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातेची ही तिसरी प्रसुतीची वेळ होती.
दरम्यान रात्री १२ वाजताच्या दरम्यान कुंता पडवळे या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. यानंतर तिला रुग्णालयाच्या प्रसूती गृहात दाखल करण्यात आले. यावेळी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेले स्त्रीरोगतज्ञ डॉ. आशिष सोनवणे यांनी तिची प्रसूती केली. काही वेळातच अचानक महिलेचे हृदय थांबले आणि मातेने तिथेच दम सोडला. बाळाचे ठोके सुरू असल्याने प्रसूती करण्यात आली. मात्र प्रसूती होता होता, बाळाचाही मृत्यू झाला. दरम्यान झालेल्या मृत्यूने या भागातील आरोग्य सेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.