गरिबांचे प्रश्न सुटले नाही तर बसपा विधानभवनावर मोर्चा काढणार : डॉ. हुलगेश चलवादी

0
188

बसपाच्या परिवर्तन मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी,दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या गोरगरीब नागरीकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. अन्यथा बसपाचे प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ आदेशाने आगामी काळात बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा गुरुवारी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी दिला आहे.

गुरुवारी (दि.२२) बसपा च्या वतीने डॉ. चलवादी यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून मनपा भवन समोर “परिवर्तन मोर्चा” काढण्यात आला. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना डॉ. चलवादी बोलत होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे मुंबई महामार्गावरून मोरवाडी चौकातून पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे मोर्चा काढण्यात आला नंतर सभा घेण्यात आली. सभेनंतर आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात ज्येष्ठ नेते टेक्सास गायकवाड, पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदिप लगाडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशिल गवळी, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गायकवाड, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अनिल रणनवरे, महिला शहर अध्यक्षा ज्योतीताई लांडगे तसेच धम्मदिप लगाडे, बलराज कटके, बन्सी रोकडे, प्रवीण वाकोडे, रमेश केशव, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब सरवदे, मधुकर इंगळे, सुनील चटोले, अनिल रणवरे, राजेश डावरे, विकी पासोटे, विकास सूर्यवंशी, सुरज गायकवाड, अर्जुनसिंग पोवार, महेश प्रक्षाळे, कल्याण ओव्हाळ, राजूभाऊ निकाळजे, दीपक भालेराव, अरविंद म्हस्के, प्रवीण साखरे, मंदाकिनीताई भोसले आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. चलवादी यांनी मागण्या केल्या की, सर्व भागात २४ तास पाणीपुरवठा केला पाहिजे. अर्धा, एक गुंठा जागेतील बांधकाम गुंठेवारी अंतर्गत नोंदवून घेण्यासाठी आकारली जात असलेली रक्कम कमी करून नियम शिथिल करावे. रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन आहे त्याच जागेवर अगोदर मोबदला देवून करावे. मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळावेत. अनधिकृत बांधकाम बाबत “गरिबांना भय व श्रीमंतांना अभय” आता चालणार नाही तर नियम शिथील करून गरिबांना न्याय द्यावा. माता रमाई यांचे स्मारक, राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे विस्तारित जागेत सुशोभीकरण करण्यात यावे. एसआरए अंतर्गत झोपडपट्टी धारकांचे जागेवरच पुनर्वसन करावे. तसेच प्रत्येक झोपडीधारकांना पाचशे स्क्वेअर फुटांचे घर द्यावे.

महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप त्वरित करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे असणाऱ्या आरक्षित जागेत माता रमाईच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे. पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागात कंत्राटी सर्व कचरावेचक कामगारांना मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार “समान काम समान वेतन” देण्यात यावे, तसेच वैद्यकीय उपचाराकरिता किमान पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा. या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशीही मागणी डॉ. चलवादी यांनी केली.