पिंपरी दि.४ (पीसीबी ) – नवरात्र उत्सवाला मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. यंदा दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर गरबा-रास दांडिया खेळण्याचा आनंद सर्वजण घेत आहेत. श्री सिध्दीविनायक नवरात्र महोत्सव आणि भाजप नेते एकनाथ पवार यांच्या वतीने पूर्णानगरला पंडित दीनदयाल उपाध्यय क्रीडा संकुलावर आयोजित गरबा-रास दांडिया खेळण्यासाठी महिला, तरुण-तरुणीची मोठी गर्दी होत आहे.
नवरात्रोत्सवात सेलिब्रिटी म्हणून अभिनेत्री श्रृती मराठे यांनी नुकतीच हजेरी लावली तर आज (मंगळवारी) अभिनेत्री स्मिता तांबे या उपस्थित राहणार आहेत. तसेच विजयादशमीला रावण दहन करण्यात येणार आहे. त्यामुळे नवरात्रीत गरबा, दांडियांसह अन्य कार्यक्रमांची रंगत वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यंदा गणेश उत्सवानंतर आता नवरात्री उत्सव देखील मोठया प्रमाणात साजरा केला जात आहे. गरबा आणि दांडिया खेळत आपण नवरात्रीचे नऊ दिवस साजरा करत असतो. या सर्व जल्लोषाच्या वातावरणात गरबा-दांडिया खेळण्याचा आनंद सर्वजण घेत आहेत. कोरोना काळात दोन वर्ष दांडिया खेळण्यास ब्रेक लावण्यात आला होता. यावर्षी मात्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कुठलेही निर्बंध, बंधने नसल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे.
भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी पूर्णानगरमध्ये यंदा मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे. शनिमंदिर क्रीडा संकुल मैदानावर दररोज सुमारे पाच ते सात हजार महिला, मुली, मुले आणि नागरिक गरबा, दांडियाचा आनंद घेत आहेत. यावेळी गरबा खेळण्यासाठी दांडिया स्पेशल हिंदी आणि गुजराती गाण्यांच्या चालीवर सर्वजण ठेका धरत आहेत. रंगीबेरंगी स्वरूपात सजविलेल्या बांबूच्या काठ्या, गरबा-दांडिया खेळण्यासाठी महिला, मुली आणि मुलांनी परिधान केलेली वेशभूषा, लहान मुला-मुलींचा जल्लोष आणि हिंदी-गुजराती गाण्यांच्या चालीवर केलेल्या दांडियाने चांगलाच उत्साह निर्माण झाला आहे.
सर्वांनी वर्तुळात धरला ठेका, टिप-याचा आवाज, डॉल्बीचा दणदणाट, मैदानावर विद्युत रोषणाई, स्त्री-पुरुषानी रंगीबेरंगी परिधान केलेला पोशाख, महिलासह तरुण-तरुणीच्या सहभागाने नवरात्र उत्सवात आनंदाचा माहोल तयार झाला आहे. दररोज गरबा व दांडिया खेळण्यासाठी आलेल्या निवडक स्पर्धकांना वस्तू स्वरूपात बक्षिसे देण्यात येत आहेत. येत्या विजयादशमीला उद्या (बुधवारी) सायंकाळी 7 वाजता क्रीडा संकुल मैदानावर रावण दहन केले जाणार आहे. या कार्यक्रमास देखील आपण सर्वांनी उपस्थितीत रहावे, असे आवाहन भाजप प्रदेश प्रवक्ते तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले आहे.












































