विसर्जन स्थळांवर वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, जीवरक्षक, निर्माल्य संकलनाची व्यवस्था…
पिंपरी दि. ५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपरी चिंचवड शहरातील गणेश विसर्जन सुरळीत, सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावे, यासाठी सज्ज झाली आहे. विसर्जन काळात नागरिकांच्या सुरक्षेसोबतच आरोग्य सुविधा, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण, आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, स्थापत्य, सुरक्षा असे महापालिकेचे विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत.
शहरातील २७ अधिकृत विसर्जन घाटांवर प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, पार्किंग, वैद्यकीय सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाची सोय करण्यात आली आहे. मोशी खाण हे मुख्य विसर्जन स्थळ निश्चित करण्यात आले असून, येथे क्रेन, आवश्यक मनुष्यबळ, पथदिवे, रस्त्यांची सुधारणा, दिशादर्शक फलक, सुरक्षारक्षक बंदोबस्त आणि अग्निशमन यंत्रणा तैनात केली आहे. प्रत्येक घाटावर प्रशिक्षित जीव रक्षक पथके, रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्दी व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दल देखील सज्ज ठेवले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाच्या विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथके व सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, मुबलक औषधसाठा व तात्काळ उपचारासाठी आवश्यक उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर
यंदा पर्यावरणपूरक उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला आहे. शहरभरात कृत्रिम जलकुंडे व निर्माल्य संकलन कुंडे उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी हार, फुले, पाने व पूजेचे साहित्य थेट नदी-नाल्यात न टाकता निर्माल्य कुंड्यांमध्ये टाकावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. संकलित निर्माल्यापासून कंपोस्ट खत व सुगंधी उत्पादने तयार करण्याची योजना महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. तसेच ‘पुनरावर्तन’ उपक्रमांतर्गत २६ केंद्रांवर शाडू मातीच्या मूर्ती संकलित करून मूर्तिकारांना शाडू माती पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय पीओपी मूर्तींसाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून प्रदूषण नियंत्रणाची सोय करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी विसर्जनासाठी अधिकृत घाटांचा वापर करावा, नदीत थेट प्रवेश करू नये, लहान मुलांना पाण्याजवळ एकटे सोडू नये तसेच निर्माल्य थेट पाण्यात न टाकता कुंड्यांमध्ये जमा करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विसर्जन घाटांवर जीव रक्षक, वैद्यकीय पथके व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात असून, पर्यावरणपूरक व सुरळीत विसर्जनासाठी महापालिका सज्ज आहे. नागरिकांनी देखील विसर्जन घाटांवर तैनात असणारे रेस्क्यू पथक व सुरक्षा पथकांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
मूर्ती संकलन प्रभागनिहाय आकडेवारी
आकडेवारी ४ सप्टेंबर २०२५ रात्री १० वाजेपर्यंतची
अ प्रभाग : ६,५१२
ब प्रभाग : १६,९०८
क प्रभाग : ४,८५५
ड प्रभाग : ६,९६७
ई प्रभाग : ६,०८९
फ प्रभाग : ८,०९२
ग प्रभाग : ७,०७९
ह प्रभाग : ५,९६७
एकूण : ६२,४६९
(पर्यावरण पूरक मूर्ती : १४,००८
पीओपी मूर्ती : ४८,४६१)