पिंपरी दि. २६ (पीसीबी) – ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वल्लभनगर आगारातून कोकणवासीयांसाठी ग्रुप बुकिंग व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, लोकप्रतिनिधींनी आगारप्रमुखांशी चर्चा केली. त्यानुसार 28 ते 30 ऑगस्टदरम्यान एकूण 12 गाड्या गुप बुकिंगसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
गणेशोत्सवाकरिता दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरातून हजारोच्या संख्येने कोकणवासी आपापल्या गावाला जात असतात. या करिता शहरातील विविध संस्थेच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाकडून ‘ग्रुप बुकिंग’द्वारे गाड्यांचे बुकिंग केली जाते. यावर्षी वल्लभनगर एसटी आजारातून ग्रुप बुकिंगला मान्यता दिली होती. त्याप्रमाणे जवळजवळ 30 गाड्यांकरिता प्रवाशांचे पैसे जमा करून ‘ग्रुप बुकिंग’ घेण्यात आली. मात्र, ऐनवेळी ‘ग्रुप बुकिंग’ला गाड्या देता येणार नाही, असे सांगण्यात आले. परिणामी, कोकणात जाणाऱ्या ग्रुप बुकिंगमधील प्रवाशांची अडचण झाली होती.
शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आगा प्रमुखांना याचा जाब विचारला. मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. आमदार महेश लांडगे यांनी आगारप्रमुखांना भेटून ग्रुप बुकिंगची सुविधा पूर्ववत करण्याची विनंती केली. त्यानुसार ही सेवा पुन्हा सुरु झाली.
माजी नगरसेवक शितल शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, कोकण प्रवासी संघाचे अध्यक्ष दादा हाटले, सिंधुदुर्ग एकता मित्र मंडळाचे विलास गवस, सचिन फोंडके, रुपेश गवस, महेश देसाई, जयेश भुवड, बाळा गुरव, मिथुन चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रदीप पडवळ, रवी देऊळकर, सागर गावडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.