गडसंवर्धन संस्था इतिहास कार्यशाळा पुणे येथे संपन्न

0
5

पुणे दि.२७ –
पुणे येथे वीर बाजी पासलकर स्मारक येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित गडसंवर्धन संस्था इतिहास अभ्यास कार्यशाळा संपन्न झाली. या मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील विविध दुर्गसंवर्धन संस्थांचे एकशे वीस प्रतिनिधी सामील झाले होते.गडकोटांवर संवर्धन करणाऱ्या संवर्धकांना इतिहासासोबतच किल्ल्यांचे संवर्धन करताना लक्षात घेण्याच्या गोष्टी यांविषयी वर्गात मार्गदर्शन केले गेले. व्याख्याते सौरभ कर्डे यांनी ‘ गडपती शिवराय ‘ या विषयाची मांडणी केली. जावळीतील रायगड आणि प्रतापगड या किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी त्यांनी उलगडून सांगितली.त्याच प्रमाणे जावळीत असलेल्या प्रतापगडच्या साहाय्याने अफजलखानाचे क्रूर धर्मांध आक्रमण परतवून लावण्याची शिवरायाांची दुर्गनीती त्यांनी सांगितली. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात यांनी शिवरायांच्या अकस्मात मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणाचा मराठ्यांचा लढा याविषयी मार्गदर्शन केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची अटक ते कटक घोडदौड त्यांनी सांगितली. मराठ्यांचा स्वराज्य ते साम्राज्य हा प्रवास त्यांच्या मांडणीमधून उपस्थितांना समजावला.
प्रा. प्र. के. घाणेकर यांनी ‘ किल्ला समजून घेताना ‘ या सत्रामध्ये शिवकालीन तसेच प्राचीन किल्ल्यांचे दुर्गशास्त्र समजावून सांगितले. या किल्ल्यांच्या संवर्धनातील कागदोपत्री नोंदींची गरज आणि महत्त्व त्यांनी आपल्या मांडणीतून ठळकपणे मांडले. या सत्रानंतर उपस्थितांच्या शंकांचे निरसन त्यांनी केले.या प्रसंगी दुर्ग संवर्धकांचा प्रा.घाणेकर सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
श्री शिवशंभू विचार मंचचे रूपेश मोरे, ज्ञानेश्वर पठाडे, तसेच चित्रकार प्रमोद मोर्ती या अभ्यास वर्गाला उपस्थित होते.
कु. हर्षदा धुमाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री. अक्षय चंदेल यांनी आभार मानले.