खोल्यांवर ताबा मारून जीवे मारण्याची धमकी

0
448

कासावाडी, दि. २५ (पीसीबी) – घरावर ताबा मारून सहा जणांनी एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 12 आणि 24 जून रोजी गुलिस्ताननगर, कासारवाडी येथे घडली.

सर्फराजताज शेख उर्फ रावण (वय 25), शहाबाज ताज शेख (वय 23), अरबाजताज शेख (वय 22), जोहल ताज शेख (वय 20), नवाजताज शेख (वय 19), महिला (वय 48, सर्व रा. गुलिस्ताननगर, कासारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समशेर आलम बशीर शेख (वय 49, रा. गुलिस्ताननगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी रात्री साडेआठ वाजता आरोपी फिर्यादी राहत असलेल्या इमारतीत आले. इमारतीमधील दुस-या आणि तिस-या मजल्यावर जाऊन रूमचे कुलूप तोडून रूमवर कब्जा केला. फिर्यादी यांनी आरोपींना प्रतिकार केला. ही इमारत आमच्या मालकीची आहे, तुम्ही आमच्या परस्पर इथे राहू शकत नाही, असे फिर्यादी यांनी समजावून सांगितले.

त्यावर आरोपी सर्फराज आणि शहाबाज यांनी फिर्यादीस तलवार दाखवून, तू मला ओळखत नाही. या परिसराचा मी भाई आहे. कुणालाही विचार रावण कोण आहे, रावण गॅंग काय आहे. इथे राहिलास तर मुंडी छाटून टाकेन, अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या गळ्याला आरोपींनी तलवार लावली असल्याने फिर्यादी गप्प राहिले. त्यानंतर 24 जून रोजी आरोपींनी फिर्यादी यांना घराजवळ अडवले. तू ज्या खोलीत राहतो, ती खोली खाली कर. नाहीतर तुझे मुंडके छाटून टाकेन, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.