खोट्या गॅरंटीच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत: संजोग वाघेरे पाटील

0
123
  • ज्यांना संधी दिली, त्यांनी प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले
  • कर्जतमध्ये मेळाव्यात संजोग वाघेरेंसाठी इंडिया फ्रंटची वज्रमूठ

कर्जत, 20 (प्रतिनिधी) – ज्यांना तुम्ही दहा वर्षे संसदेत काम करण्याची संधी दिली. त्यांनी सर्वसामान्य मतदारांनी टाकलेला‌ विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काम करणं गरजेचं होतं. पण, त्यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले. असंख्य ‌गावांमधील पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडवता‌ आला नाही. ते आता पुन्हा गॅरंटीच्या नावाखाली फक्त आश्वासने द्यायला येतील. परंतु, त्यांच्या या खोट्या गॅरंटीच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत, असे मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व इंडिया फ्रंटचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले.

अधिकृत उमेदवार संजोग संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे इंडिया फ्रंटचा संयुक्त मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याप्रसंगी कर्जत खालापूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार) जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, गोपाळ शेळके, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका सरचिटणीस रामशेठ राणे, कॉंग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय गवळी, तालुका अध्यक्ष शंकर भुसारी, शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य दिनानाथ देशमुख, महिला संघटिका सुवर्णा जोशी, माई कोतवाल, हिराजी पाटील, शेतकरी महिला आघाडीच्या मंदाताई म्हात्रे यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, कित्येक वर्षांपासून आम्ही पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक आणि राजकीय काम करताना विचार‌ करत होतो की, मावळच्या मतदारांनी निवडून दिलेला माणूस चांगला काय करत असावा. परंतु, दहा वर्षांत त्यांनी काम केले नाही. हे मतदारसंघातील आमच्या महिला भगिनींना पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर जावे लागत असल्याचे पाहिल्यानंतर लक्षात येते. अत्यंत जिवाळ्याचा शश म्हणजे पाणी हा जलजीवनाचा प्रश्न सोडविता का आलेला नाही‌, असा‌ सवाल‌‌ करत वाघेरे पाटील यांनी टीका केली. मतदारसंघात काहि ग्रामीण भागात पाणी प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण काम करु, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

“आपल्याला त्यांचे नाव घ्यायचे नाही, ते चिडतात”
पिंपरी चिंचवड सारख्या शहरात अनेक वर्षे काम करताना राजकारणातील प्रामाणिकपणा जपण्याचा कायम प्रयत्न केला आहे. परंतु खासदार त्याच शहरातील असताना ते मला ओळखत नाहीत, असं म्हणत आहेत. त्यांना माझ्याबद्दल माहिती नसेल, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही. त्यांच्याबद्दल काही बोलले‌ की ते चिडतात आणि चुकीचे आरोप करतात, अशी टीका देखील यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी केली.

चिंचोली (ता. कर्जत) येथे हरिनाम सप्ताहाला भेट
प्रभू श्री राम नवमीनिमित्त चिंचोली (ता.कर्जत) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळ उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद घेतले. यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.