खोट्या आरोपांमुळे आमच्या कुटुंबातील एकाचा बळी गेला – किशोरी पेडणेकर

0
236

नवी दिल्ली,दि.३१(पीसीबी) – माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विजया पेडणेकर यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर सध्या एसआरए घोटाळ्यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडून बातम्या दाखवल्या जात आहेत. याचा धसका घेतल्यामुळेच आपल्या सासूबाईंचे निधन झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. या सगळ्या आरोपांमुळे पेडणेकर कुटुंबातील एक बळी गेला, अशी भावूक प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर किरीट सोमय्या यांच्याकडून आरोप केले जात आहेत. यासंबंधीच्या टीव्हीवरील बातम्या माझ्या सासूबाई विजया पेडणेकर यांनी पाहिल्या होत्या. या सगळ्यामुळे त्यांना खूप दडपण येत होते. तुला काही होणार नाही ना, असा प्रश्न त्या सतत मला विचारायच्या. तुम्ही चिंता करु नका, मला काहीही होणार नाही. माझा कायद्यावर आणि यंत्रणांवर विश्वास आहे. मी कायदेशीर लढाई लढेन. मी कोणतंही वावगं काम केलेले नाही, असे मी त्यांना सांगायचे. पण काल त्या अचानक गेल्याने आम्हाला धक्का बसला, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

त्या गेल्या काही वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. आमच्याकडे आल्या तरी त्यांना सतत घरी जायची ओढ असे. काल माझा मुलगा त्यांना घेऊन जाणार होता. माझ्या घरात छोटं बाळ आहे, त्याला आम्ही त्याच्या आईकडे पाठवले होते. मी सासूबाईंना १५ दिवस घरी राहायला सांगणार होते. पण काल माझा मुलगा त्यांना घरी आणू शकला नाही, असे पेडणेकर यांनी सांगितले. मी नगरसेविका असले तरी आमचे कुटुंब हे सर्वसामान्य आहे. त्यामुळे माझ्यावरील आरोपांची काय चौकशी करायची आहे ती करा. सध्या षडयंत्रांची मालिका सुरु आहे. त्याला काही करु शकत नाही. कायदाच हे सर्व रोखेल. मी उद्या याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात जाणार आहे. तसेच मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेही दाद मागणार आहे. किरीट सोमय्या हे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिंदे आणि फडणवीस हे त्या दबावाल बळी पडणार नाहीत, ही माझी अपेक्षा आहे. किरीट सोमय्या यांची कार्यपद्धती सर्वांना माहिती झाली आहे. किरीट सोमय्या आरोप करतात, मग ती व्यक्ती भाजपमध्ये गेल्यावर ते थांबतात. पण मी कायद्याची लढाई लढेन, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.