खोटा जात दाखला प्रकरणात नवनीत राणा आता सत्र न्यायालयात

0
314

– मुंबई उच्च न्यायालयाने जातप्रमाणपत्र रद्द करत दोन लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला होता

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात पडताळणी संदर्भातील शिवडी न्यायालयात सुरू असलेला खटला लवकरात लवकर निकाली काढण्याकरिता सत्र न्यायालयात याचिका राणांच्या वकीलांडून दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. वरिष्ठ वकील रिजवान मर्चंट यांच्यामार्फत त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

अमरावतीच्या खासदार असणाऱ्या नवनीत राणा यांचा मुंबई उच्च न्यायालयाने जातप्रमाणपत्र रद्दबातल ठरवले होते. उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी ही कारवाई केली होती. जातप्रमाणपत्र रद्द ठरवून त्यांना दोन लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला होता. उच्च न्यायालयाच्या या कारवाईमुळे नवनीत राणा यांच्या खासदारकीवर तेव्हापासूनच टांगती तलवार आहे.

अमरावतीचे शिवसेनेचे माजी खासदार व आता शिंदे गटात गेलेले आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत आक्षेप घेणारी याचिका 2017 साली उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी आपल्या निवडणूक अर्जासोबतच्या शपथपत्रात अनुसूचित जमातीचे जोडलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटा असल्याचा दावा त्यांनी केला आहे, यानंतरच उच्च न्यायालयाने राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द केले होते.

उच्च न्यायालयाच्या कारवाई नंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. 22 जून 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला यावेळी स्थगिती देण्यात आली होती. आता खटला लवकरात लवकर निकाली काढण्याकरिता सत्र न्यायालयात याचिका राणांच्या वकीलांडून दाखल करण्यात आले आहे. या याचिकेवर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.