खोटारडेपणा करणाऱ्या पूजा खेडकर आयएएस मधून कायमचा डच्चू

0
81

पुणे,1 ऑगस्ट (पीसीबी) – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) कारवाई करण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षा २०२२च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत यूपीएससीने त्यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली आहे. तसेच भविष्यातील परीक्षा, निवडींतूनही त्यांना कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नागरी सेवा परीक्षा २०२२च्या माध्यमातून शिफारस करण्यात आलेल्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांनी ओळख दडवून परीक्षा देण्यासाठी मान्यताप्राप्त प्रयत्नांचे उल्लंघन केल्याबाबत यूपीएससीकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच म्हणणे मांडण्यासाठी त्यांना २५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आवश्यक ती कागदपत्रे मिळवून म्हणणे मांडण्यासाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. या विनंतीची दखल घेऊन यूपीएससीने ३० जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. तसेच ही शेवटची संधी असल्याचे आणि आणखी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे, मुदतीत प्रतिसाद न दिल्यास यूपीएससीकडून पुढील कारवाई करण्याबाबतही स्पष्टपणे कळविण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत पूजा या स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर यूपीएससीने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासून नागरी सेवा परीक्षा २०२२च्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकर यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांची नागरी सेवा परीक्षा २०२२ साठीची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच यूपीएससीच्या भविष्यातील सर्व परीक्षा, निवडींमधून कायमचे प्रतिरोधित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.